मुक्त स्वरुपातील सामग्री – माय मराठी अभ्यासक्रम

राज्य मराठी विकास संस्थेच्या ध्येयधोरणानुसार मराठी भाषेचा ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा म्हणून विकास करणे, हे संस्थेचे ध्येय आहे. संस्थेच्या एकूण २० उद्दिष्टांपैकी ९ वे उद्दिष्ट “अमराठी समाजगटांना मराठी भाषा व संस्कृती यांच्याबद्दल आस्था व रुची निर्माण व्हावी म्हणून विविध साधने विकसित करणे, असे आहे.” हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या निमित्ताने तसेच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि जर्मन विभाग मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अन्यभाषकांना मराठी भाषेचे गुणवत्तापूर्ण अध्यापन-सामग्री तयार करण्याचा प्रकल्प राबवला जात आहे.

राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने, मुंबई विद्यापीठाचा जर्मन विभाग, ‘मायमराठी’ हा अमराठी भाषकांना आधुनिक पद्धतीने मराठी शिकवणारा अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमात अमराठी भाषकांच्या गरजांचा तपशीलवार विचार करून यासाठी आवश्यक अशी पाठयपुस्तके आणि अभ्यासपुस्तकेही तयार केली आहेत.

    • जर्मन विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्याद्वारे पहिल्या पातळीचे पुस्तक दि. १३ ऑगस्ट, २०१४ रोजी प्रकाशित झाले आहे. या अभ्यासक्रमात अमराठी भाषकांच्या गरजांचा तपशीलवार विचार करून यासाठी आवश्यक अशी पाठयपुस्तके आणि अभ्यासपुस्तकेही तयार केली आहेत.
    • पातळी २, ३, ४, ५. ६ अभ्यासक्रमही तयार आहेत. (अभ्यासपुस्तक, पाठ्यपुस्तक आणि शब्दसंग्रह)
    • लघुअभ्यासक्रमातर्गंत, परिचारिकांसाठी मराठी, रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी, बॅंक कर्मचाऱ्यांसाठी मराठी, शासकीय मराठी अशा अभ्यासक्रमांचीही पुस्तके तयार आहेत. ही सर्व सामग्री मुक्त स्वरूपात उपलब्ध करण्यात येत आहे.

राज्य मराठी विकास संस्थेने यशस्वीपणे राबवलेले अन्यभाषकांसाठीचे मराठी भाषेचे वर्ग पुढीलप्रमाणे आहेत.

– सन २०१५ मध्ये राज्य मराठी विकास संस्थेने मुंबई रेल्वे विकास कॉपोरेशन,चर्चगेट, मुंबई यांच्या कार्यालयातील १०० अन्यभाषक अधिकारी आणि कर्मचारी यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षणवर्गास उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

– सन २०१६ मध्ये राज्य मराठी विकास संस्था, मुंबई विद्यापीठ आणि तेल-अविव विद्यापीठ, इस्त्रायल यांच्यात झालेल्या करारानुसार तेल-अविव विद्यापीठात अन्यभाषकांसाठी मराठीचा वर्ग आयोजित केला होता. २८- ५५ वयोगटातील काही विद्यार्थी बेने इस्त्रायली तर काही मूळचे इस्त्रायली होते. यात विद्यार्थी, लेखक, चित्रकार, व्यावसायिक , पेन्शनर, गायक अशा एकूण २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. परदेशातही मराठी भाषेचा वर्ग यशस्वीपणे राबवला.

– सन २०१९ मध्ये राज्य मराठी विकास संस्थेने तमिळ विद्यापीठ, तंजावूर येथे अन्यभाषक विद्यार्थ्यांसाठी मराठीचा वर्ग आयोजित केला होता. पीएच.डी आणि एम.फील करणाऱ्या ३८ विद्यार्थ्यांनी या वर्गास प्रवेश घेतला होता. या वर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे या विद्यार्थ्यांना देवनागरी लिपी येत नव्हती. अशा विद्यार्थ्यांना मराठी शिकविणे आव्हानच होते. परंतु हा वर्गही यशस्वीपणे राबवला.

अमराठी भाषकांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी  शिक्षक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येते.

सन २०१६ ते  सन २०१९ या कालावधीत राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि जर्मन विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिक्षक प्रशिक्षण वर्गात ३६ विद्यार्थी सहभागी झाले होते.

सन २०२० मध्ये  राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि जर्मन विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण वर्गात ८२ विद्यार्थी सहभागी झाले होते.

मराठी विद्यार्थ्यांना अध्यापन करणे आणि अमराठी भाषिक विद्यार्थ्यांना अध्यापन करणे यात फरक आहे. म्हणून या शिक्षक प्रशिक्षणवर्गात पुढील बाबींचे अध्यापन केले जाते. पाठनियोजन कसे करावे, प्रत्यक्ष पाठ सादरीकरण, डिजिटल साधने, विविध भाषिक खेळ, प्रशिक्षणार्थीचे पाठ सादरीकरण.

 

भाग – २

शिकू द्या मुलांना मराठी आनंदाने, प्रेमाने अन् अभिमानाने

आपणच पुणे ही शिक्षणक्षेत्रात कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. शैक्षणिक समस्यासंबंधी संशोधन पद्धतीने अभ्यास करणे हे तिच्य़ा विविध कार्यांपैकी महत्त्वाचे कार्य आहे.  यासाठी संस्थेच्या मा. अध्यक्षा डॉ. सुमनताई करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली २०१२ साली सुकाणू समिती स्थापन झाली.

या समितीने मुलांचा भाषा- विकास कसा  होतो आणि त्यात पालक, शिक्षक आणि समाज यांचा कोणता वाटा असतो याचा अभ्यास करण्याच्या हेतूने “शिकू द्या मुलांना मराठी आनंदाने, प्रेमाने अन् अभिमानाने” हा प्रकल्प हाती घेतला गेला. यातील वस्तुस्थितीचे सादरीकरण दृक श्राव्य स्वरुपात केले गेले आहे.  या प्रकल्पाच्या २०१२ -१४ मध्ये पार पडलेल्या  पहिल्या भागात गर्भावस्थेपासून ते शैशवापर्यंत मुलांचा भाषाविकास कसा होतो ते दाखविले आहे.

“आपणच” च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (www.aapanach.org) त्याचाच पुढचा भाग राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक सहकार्याने  २०१८ मध्ये पूर्ण करण्यात आला आहे. हा  अभ्यास पुणे आणि सातारा जिल्ह्यातील १२ शाळांच्या सहकार्याने पूर्ण करण्य़ात आला आहे. यात जिल्हापरिषद, नगर/महानगर पालिकांच्या शाळा, खासगी शाळा यांचा समावेश आहे. आपणच या संस्थेने केलेल्या कामाचा अहवाल यूट्यूबवर उपलब्ध करण्यात आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=1WpAUQpDKOg&list=PLsUUmeSpm0T2fFYp0_MfwAl09L7gmnwZa

अभिप्राय द्यायला विसरू नका!