गो. वि. करंदीकर हे मराठीतील ख्यातनाम प्रयोगशील कवी, लघुनिबंधकार, भाषांतरकार आणि साक्षेपी समीक्षक. विंदा करंदीकर या नावाने करंदीकरांनी वैविध्यपूर्ण कविता लिहिली. आशयाचे, रचनेचे विविध प्रयोग केले. गझल, मुक्त सुनीते, तालचित्रांपासून ते बालकविता आणि विरूपिकेपर्यंत नाना प्रकारे आपल्या प्रतिभेची वाट रेखून पाहिली. विंदांच्या या विविधांगी कवितेची ओळख करून देणारी दोन संकलने इथे श्राव्य पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कविवर्य मंगेश पाडगावकर आणि साहित्यिक, समीक्षक प्रा. विजया राजाध्यक्ष यांच्या साक्षेपी संपादनांतून साकारलेली ही संकलने विंदांच्या कवितांचा नेटका परिचय रसिकांना करून देतात. नामवंत कलावंतांच्या आवाजात या कविता श्राव्य पुस्तके म्हणून इथे सादर केल्या आहेत.
ही पुस्तके श्राव्य पुस्तके म्हणून रूपांतरित करण्यासाठी श्री. उदय करंदीकर यांनी संस्थेला अनुमती दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या श्राव्य पुस्तकांचे सर्व अधिकार राज्य मराठी विकास संस्थेच्या अधीन असून ही पुस्तके जनतेसाठी विनामूल्य स्वरूपात संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. नक्कल करून त्यांची विक्री करणे, ती आपल्या संकेतस्थळावर घालणे इ. गोष्टी करणाऱ्या व्यक्ती वा संस्था आढळल्यास त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.