- महाराष्ट्राची व्यवहारभाषा, प्रशासनिक भाषा आणि ज्ञानभाषा या तिन्ही स्तरांवर मराठी भाषेचा सर्वांगीण वापर वाढविण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करणे.
- कृषी, वैद्यक, उद्योग, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे इ. व्यवहारक्षेत्रांत मराठी भाषेचा वापर वाढण्यासाठी आवश्यक साधनसाम्रगी विकसित करणे; तसेच भाषेशी संबंधित असलेल्या तंत्रविद्यांचा विकास करणे;
- वेळोवेळी भाषिक पाहणीचे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून व मराठीच्या विविध व्यवसायक्षेत्रांतील स्थितिगतीचे निरीक्षण करून त्यांचे समाजभाषावैज्ञानिक अहवाल शासनास सादर करणे.
- शासनव्यवहाराच्या प्रशासन, कायदा,न्याय, जनसंपर्क अशा विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांमध्ये मराठी भाषेचा लोकाभिमुख आणि सुलभ वापर वाढविण्यासाठी भाषिक उपक्रम हाती घेणे व उपकरणे निर्माण करणे.
- शिष्टाचार, औपचारिक भाषाव्यवहार व भावाभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी भाषिक नमुने निर्माण करणे व उपलब्ध करणे.
- मराठी भाषेतून नव्या ज्ञानाची निर्मिती होण्यासाठी परिभाषेची घडण, निरनिराळ्या ज्ञानस्त्रोतांची उपलब्धी, भाषेचा सर्जनशील वापर वाढविणारे कृतिकार्यक्रम यांना प्रोत्साहन देणे.
- बहुजनांच्या बोलीभाषा आणि प्रमाण मराठी यांच्यातील अभिसरण वाढवून यांच्या समवर्ती संबंधातून मराठी भाषा अधिकाधिक लोकाभिमुख व समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे.
- लेखनविषयक नियम, वर्णमाला, भाषिक वापराची यांत्रिक उपकरणे, संगणकीय आज्ञावली यांच्या वापरात सुसूत्रता व सुबोधता आणण्यासाठी शासनाला मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करून देणे. माहिती तंत्रज्ञानविषयक गरजा लक्षात घेऊन मराठी अनुरुप आज्ञावली विकसित करणे. मराठी भाषेतील माहिती व निधी-पाया विस्तृत करणे.
- अमराठी समाजगटांना मराठी भाषा व संस्कृती यांच्याबद्दल आस्था व रुची निर्माण व्हावी म्हणून विविध साधने विकसित करणे.
- मराठी भाषेची अंगभूत वैशिष्ट्ये कायम राखून भाषासमृद्धीसाठी भाषांतरे, नव्या शब्दांचा स्वीकार, प्रतिशब्दांची निर्मिती अभिजात व समकालीन साहित्यचर्चा आणि ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रातील पायाभूत व मौलिक प्रवृत्तिप्रवाह मराठीत आणण्यासाठी कार्य करणे.
- समाजातील शेतकरी, कामगार, मुले, स्रिया, आदिवासी इत्यादी वंचित गटांच्या हितासाठी आणि विकासासाठी माध्यमभाषेचा सर्जनशील वापर वाढविण्याकरिता विविध उपक्रम हाती घेणे व उपकरणे निर्माण करणे. समाजाच्या सक्षमीकरणामध्ये भाषेचा महत्त्वाचा वाटा असतो हे लक्षात घेऊन भाषिक उपक्रमाचे आयोजन करणे.
- कुठल्याही संस्कृतीचा संवेदनस्वभाव भाषेच्या माध्यमातूनच व्यक्त होत असल्यामुळे मराठीच्या भाषाविकासासाठी परिमाणे असतील. यादृष्टीने मराठी भाषक समाजाच्या शेती, बाजरपेठा, कलाव्यवहार, कौटुंबिक आचारधर्म, आरोग्य-संवर्धन, नैतिक जाणिवा अशा सर्व सांस्कृतिक अंगांचा भाषाविकासासाठी असलेला अतूट संबंध लक्षात घेऊन वेळोवेळी भाषाविकासाचे उपक्रम आखणे.
- अन्य राज्यात व परदेशांत असलेल्या मराठी भाषकांसाठी विविध भाषिक उपक्रम करणे.
- साहित्य संस्कृति मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, भाषा संचालनालय, लोकसाहित्य समिती, साहित्य अकादमी, साहित्य परिषदा, पाठ्यपुस्तक मंडळ, नॅशनल बुक ट्रस्ट, विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ यांसारख्या संस्था तसेच महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील सर्व विद्यापीठांचे मानव्यविद्या, सामाजिक शास्रे व मराठी विभाग यांच्या संपर्कात राहून त्यांच्या उपक्रमांची नोंद ठेवणे, समन्वय घडविणे व त्यांनी निवडलेल्या उपक्रमांची पुनरावृत्ती टाळून नवे उपक्रम हाती घेणे.
- संस्थेने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मराठीच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या विस्तार सेवा देणे, अल्पमुदतीचे अभ्यासक्रम आखणे, परस्पर सहकार्याने पाठ्यक्रम, पुस्तकनिर्मिती व इलेक्ट्रॉनिक साहित्यनिर्मिती करणे.
- स्वामित्वधन,देणग्या, शुल्क,विक्री मूल्य इत्यादी मार्गांनी संस्थेचा राखीव निधी वाढवणे.
- भाषाविषयक प्रश्न आणि त्याबाबतचे कार्यक्रम यातल्या यशापयशांचा सातत्याने आढावा घेऊन कार्याचे स्वरुप ठरविणे. त्यानुसार निर्णय घेणे, ते प्रसिद्ध करणे आणि घेतलेले निर्णय कार्यवाहीत आणण्यासाठी निश्चित असे मार्ग आखून व किती काळात कोणता टप्पा गाठायचा हे ठरवून काम करणे आणि प्रतिवर्षी नियामक मंडळामार्फत विधिमंडळाला कामकाज अहवाल सादर करणे.
- मराठी भाषा व महाराष्ट्र संस्कृतीच्या विकासाचे साधन म्हणून समांतर लोकशिक्षणाची भूमिका पार पाडणे.
- महाराष्ट्र राज्याचे मध्यवर्ती माहिती संकलन व वितरण केंद्र निर्माण करून माहितीसेवा पुरविणे.
- भाषिक पाया सुधारण्यासाठी अध्ययनसामग्री निर्माण करणे, प्रशिक्षणाची उपकरणे विकसित करणे व अन्य आवश्यक उपक्रम राबविणे.
प्रशासकीय व्यवस्था
संस्थेचे कामकाज तिच्या नियामक मंडळाच्या सल्ल्यानुसार चालते. संस्थेचे कार्यक्रम/ उपक्रम/ प्रकल्प यांचे अग्रक्रम ठरविण्यासाठी व त्यांसंबंधातील आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी प्रकल्प समिती, वित्त समिती व कार्यकारी समिती यांची निश्चिती नियामक मंडळातील सदस्यांमधून केली जाते. संस्थेचे आर्थिक, प्रशासकीय व कायदेशीर नियोजन आणि व्यवस्थापन तसेच संस्थेच्या विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या कामावर देखरेख ठेवण्याचे काम या समित्यांमार्फत होते. संस्थेच्या नवीन प्रकल्पांसाठी या समित्यांची तसेच नियामक मंडळाची मंजुरी आवश्यक असते.