महाराष्ट्र राज्याने २०१० साली स्वीकारलेल्या सांस्कृतिक धोरणातील प्रकरण ४ “भाषा आणि साहित्य” याअंतर्गत – बृहन्महाराष्ट्र या विभागात बृहन्महाराष्ट्रातील मंडळांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ‘बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसाहाय्य’ योजना राबविण्यात येत आहे.
“महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती या संदर्भात कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांना तसेच महाराष्ट्राबाहेर मराठी ग्रंथ प्रकाशनाचे दर्जेदार कार्य करणाऱ्या संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येईल.”
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणात नमूद केल्यानुसार सदर योजना सन २०१६ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राज्य मराठी विकास संस्थेकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर सन २०१६-१७ पासून राज्य मराठी विकास संस्थेने बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसाहाय्य योजना कार्यान्वित केली आहे.
महाराष्ट्राबाहेरील अन्य राज्यातही मराठी भाषा, साहित्य व संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती या संदर्भात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्था/ मंडळे/ ग्रंथालये यांना त्यांनी पाठवलेल्या प्रस्तावाची छाननी करून या योजनेंतर्गत अर्थसाहाय्य केले जाते.
राज्य मराठी विकास संस्थेने या योजनेअंतर्गत, निश्चित केलेल्या विहित कार्यपद्धती व निकषांना अनुसरून महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यात मराठी भाषा, साहित्य व संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी कार्य करणाऱ्या देशांतर्गत बृहन्महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थांना/मंडळांना या योजनेअंतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये २० लक्ष रुपयांच्या मर्यादेत अर्थसाहाय्य (प्रत्येकी रु. २.०० लक्षच्या मर्यादेत) मंजूर करण्यात आले होते. तथापि, बृहन्महाराष्ट्रातील संस्था व मंडळांचा या योजनेसंदर्भातील वाढता प्रतिसाद लक्षात घेता सन २०१९-१९ पासून सदर तरतूद किमान रु. ५० लक्ष करण्यात आली आहे. तसेच सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३ मंडळे / संस्था यांना रु. १६,२५,०००/- इतके अर्थसाहाय्य विशेष बाब म्हणून विहित पद्धतीने मंजूर करण्यात आले.
संबंधित मंडळे / संस्था यांना सदर अर्थसाहाय्याची मंजूर रक्कम दोन टप्प्यात (सुरुवातीस ६० टक्के व संबंधित मंडळे/संस्था यांच्याकडून प्रस्तावित प्रकल्प/उपक्रम पूर्ण होऊन त्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर उर्वरित ४० टक्के रक्कम) NEFT द्वारे वितरित करण्यात येते.
सन २०१६-१७ पासून वर्षनिहाय अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आलेल्या संस्थांची संख्या व रक्कम पुढीलप्रमाणे –
आर्थिक वर्ष | अर्थसाहाय्य मंजूर केलेली मंडळे / संस्था | एकूण मंजूर रक्कम |
२०१६- १७ | ११ | रु.१५,७४,००० /- |
२०१७- १८ | ८ | रु. ९,६१,००० /- |
२०१८- १९ | ३३ | रु.४६,८१,०००/- |
२०१८- १९ (विशेष बाब) | ३ | रु.१६,२५,०००/- |
२०१९-२० | ३३ | रु.४६,०६,०००/- |
उपरोक्त आर्थिक वर्षात ज्या मंडळांनी / संस्थांनी सदर योजनेचे निकष, अटी व शर्ती पूर्ण करून प्रस्तावित उपक्रम पार पाडले त्यांना राज्य मराठी विकास संस्थेतर्फे दि. ३१ मे २०२१ पर्यंत अर्थसाहाय्याची जेवढी रक्कम वितरित करण्यात आली तिचे तपशील खाली देण्यात आले आहेत. जी मंडळे / संस्था यांची कागदपत्रे यांची पूर्तता होणे बाकी आहे त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे प्राप्त झाल्यावर उर्वरित रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत बृहन्महाराष्ट्रातील विविध मंडळे / संस्था यांना विहित अटी व शर्तींच्या अधीन राहून आजवर वितरित करण्यात आलेल्या रकमेचा सविस्तर तपशील खाली नमूद केला आहे.