मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली . ‘संस्था नोंदणी अधिनियम, १८६०’ आणि ‘ सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५०’ या अन्वये दिनांक २ जानेवारी १९९३ रोजी संस्थेची धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्याकडे स्वायत्त संस्था म्हणून नोंदणी झाली.

महाराष्ट्र शासनाने दिनांक २५ जून १९७९ रोजी मुंबई येथे `महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक अभ्यासक्रमात व प्रशासनात मराठी भाषेचे स्थान’ या विषयावर एक परिषद घेतली होती. त्या परिषदेत मराठी भाषेसाठी एक राज्यस्तरीय संस्था स्थापण्यात यावी, अशी सूचना पुढे आली. या सूचनेचा विचार करण्यासाठी १) अशी संस्था असावी का, आणि २) असायची तर कशा स्वरूपाची असावी, याविषयी विस्तृत टिप्पणी करण्यासाठी एक अनौपचारिक अभ्यासगट निर्माण करावा, असा निर्णय शासनाने घेतला.

या अभ्यासगटाचे निमंत्रक म्हणून प्रा. वसंत बापट आणि अन्य सदस्य म्हणून प्रा. मे.पुं.रेगे, प्रा. वसंत दावतर, डॉ. अशोक केळकर आणि प्रा. मं. वि.राजाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. अभ्यासगटाच्या सदस्यांनी जो टिप्पणीवजा आराखडा तयार केला, त्याचा सारांश पुढीलप्रमाणे होता:

  • मराठी भाषा विकासासाठी एका स्वतंत्र राज्यस्तरीय संस्थेची आवश्यकता असून तिला तिचे स्वतंत्र कार्यक्षेत्र असेल.
  • अन्य राज्यांत अशा संस्था आहेत.
  • संस्थेचे नाव ‘राज्य मराठी विकास संस्था’ (स्टेट इन्स्टिट्यूट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मराठी) असे असावे.
  • संस्था सरकारशी संलग्न परंतु बर्‍याच अंशी स्वायत्त असावी. या संस्थेचे काम विद्वत्सुलभ म्हणजे ‘अकॅडेमिक’ पद्धतीने चालावे.
  • तसे झाल्यास तिने केलेल्या योजनाबद्ध कामांची फळे कालांतराने पण निश्चितपणे चाखावयास मिळतील.
  • संस्थेचे ग्रंथालय असावे, लोककलांचे नमुने, ध्वनिफिती व दृश्य स्वरूपात जतन करण्याची आणि अभ्यासकांना ते उपलब्ध करून देण्याची सोय असावी
  • संस्थेत ध्वनिमुद्रिते, भाषावैज्ञानिक संशोधनार्थ प्रयोगशाळा, ध्वनिमुद्रणशाळा, ध्वनिशाळा, मुद्रणजुळणीघर इत्यादी सोयी असाव्या

टिप्पणीच्या शेवटी म्हटले आहे –

“भाषेचा विकास हा अखेर भाषिकांचा विकास असतो.
परिभाषा, साक्षरताप्रसार, शुद्धलेखनसुधारणा या किंवा अशा मोजक्या व अतिपरिचित विषयांमध्येच
भाषेच्या विकासाचा विचार अडकून पडणे हिताचे नाही. “

‘मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास’ हे संस्थेचे बोधवाक्य आहे. त्यावरून संस्थेच्या व्यापक कार्यकक्षेची कल्पना येऊ शकेल.
विविध क्षेत्रात मराठीचा होणारा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प्रयत्नशील राहावे व मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी ही या संस्थेच्या स्थापनेमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. (सविस्तर उद्दिष्टे). त्यांनुसार सर्व स्तरांवर मराठीचा विकास साधण्यासाठी संस्था स्वतंत्रपणे उपक्रम हाती घेते. भाषा व संस्कृतीच्या क्षेत्रात मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम करणाऱ्या विविध शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये समन्वय राखून त्या संस्थांच्या साहाय्यानेही काही उपक्रम संस्था पार पाडते.