वस्त्रोद्योगाची सर्वांगीण व अद्ययावत माहिती मराठी भाषेतून उपलब्ध करून देणारा ‘वस्त्रनिर्मिती माहितीकोश’ हा प्रकल्प राज्य मराठी विकास संस्था आणि दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था, इचलकरंजी यांनी संयुक्तपणे कार्यान्वित केलेला प्रकल्प आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञानामुळे भारतातील वस्त्रोद्योगाचा, वस्त्रनिर्मितीकलेचा विकास कसा कसा होत गेला ते विकासाचे टप्पे, भारतीय वस्त्रोद्योगाचे आजवरचे स्वरूप त्याची वैज्ञानिक-तांत्रिक प्रगती, महाराष्ट्राचे या उद्योगामधील स्थान, होऊ घातलेले जागतिकीकरण या सर्वांचा साकल्याने विचार या कोशात करण्यात आला आहे.
मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या संदर्भात वस्त्रोद्योगाला प्राचीन काळापासून महत्त्वाचे स्थान आहे, परंतु या विषयासंबंधी फारच थोडे दर्जेदार लिखाण मराठी भाषेत उपलब्ध आहे. ही त्रुटी दूर करण्यासाठी सर्वसामान्य जिज्ञासूला समजेल अशी माहिती या कोशात देण्यात आली आहे. या माहितीकोश प्रकल्पांतर्गत एकूण नऊ खंड संकल्पित असून संस्थेने आतापर्यंत पुढील पाच खंडांचे प्रकाशन केलेले आहे.
- खंड-१ – तंतुनिर्माण व तंतुविज्ञान : तंतूंची उत्पादन प्रक्रिया, त्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म, त्यांच्या उपयोगाची विविध क्षेत्रे तसेच या तंतूंच्या परीक्षण-पद्धतींविषयीची सविस्तर माहिती या खंडात दिली आहे.
- खंड-२ – सूतनिर्माण – सुताची गुणवत्ता मोजण्याच्या विविध पद्धती, त्यासाठी वापरली जाणारी उपकरणे, सूतनिर्मितीच्या पद्धती या सर्वांचा तपशील प्रस्तुत खंडात देण्यात आलेला आहे.
- खंड-३ – कापडनिर्माण – कापडाची रचना आणि त्यावर प्रभाव टाकणारे विविध घटक, कापडाच्या विणी, कापडातील दोष, त्यांची कारणे आणि प्रतिबंधक उपाय, कापडाची गुणवत्ता मापण्याची पद्धती आणि त्यासाठी लागणारी उपकरणे, वस्त्र आणि वस्त्रनिर्माण या प्रक्रियासंबंधीची पायाभूत गणिते आदींची सविस्तर माहिती या खंडात दिली आहे.
- खंड-४ – रासायनिक प्रक्रिया – सर्व महत्त्वाचे नैसर्गिक आणि मानव-निर्मित तंतू विचारात घेऊन आवश्यक त्या रासायानिक प्रक्रिया आणि यंत्र-सामग्री यांची सविस्तर माहिती या खंडात दिलेली आहे.
- खंड-५ – फॅशन व वस्त्रप्रावरणे – फॅशन व वस्त्रप्रावरणे क्षेत्रातील विविध प्रक्रियासंबंधीची पायाभूत माहिती या खंडात दिली आहे.
- खंड- ७ – वस्रोद्योग व्यवस्थापन – वस्रोद्योग क्षेत्रातील विविध प्रक्रियाचे व्यवस्थापन कसे करावयाचे याबाबतची माहिती या खंडात दिली आहे.
माहितीकोशाच्या उर्वरित चार खंडांचे काम सुरू असून, या खंडांचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. खंड-६ – तंत्रोपयोगी वस्त्रे, खंड-८ -वस्त्रसंकल्पनेचा सांस्कृतिक आविष्कार, खंड-९ – वस्त्रोद्योग परिभाषाकोश.