तमिळ विद्यापीठ तंजावर येथील मोडी कागदपत्रांचे जतन, संवर्धन (प्रिझर्वेशन व कंझर्वेशन), संगणकीकरण (डिजिटायजेशन) व देवनागरी लिप्यंतर, भाषांतर व सूची करून ते प्रकाशित करणे. (मोडी हस्तलिखितांचे मराठीकरण)

दक्षिणेमध्ये तमिळनाडू येथे सन १६७६ ते १८५५ या कालखंडापर्यंत छ. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले व त्यांच्या वंशजांचे राज्य होते. त्यांचा राज्यकारभार तंजावर येथून चालत असे. त्यामुळे तंजावर ही त्यांची राजधानी होती. त्यांच्या राज्यकारभाराचा कालखंड सुमारे १८० एवढा वर्षांचा असून या कालखंडातले समाजजीवन, इतिहास, त्यांचे शैक्षणिक व सांस्कृतिक धोरण. भाषा, साहित्य, संस्कृती, वैद्यकीय आदी विषयांची सर्व कागदपत्रं मोडी लिपीत उपलब्ध आहेत. त्यावेळी मराठा राज्यकर्त्यांच्या प्रशासनाची भाषा ही मराठी असून तिची लिपी ही मोडी आहे. ही ऐतिहासिक कागदपत्रं मोडीमध्ये असल्याकारणाने या राज्यकर्त्यांच्या कार्याची माहिती मराठी भाषेमध्ये फारसी उपलब्ध नाही. त्यामुळे ही ऐतिहासिक माहिती मराठी भाषिकांना, अभ्यासकांना, संशोधकांना, वाचकांना उपलब्ध करण्यासाठी व त्या राज्यकर्त्यांची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीबरोबरच तंजावर मराठा राजांची जीवनपद्धती व प्रशासन व्यवस्थेसंबंधित धोरणांच्याबाबत मराठी भाषिकांना व इतरांना माहिती उपलब्ध करण्यासाठी या प्रकल्पाची आखणी करण्यात येऊन तमिळ विद्यापीठ तंजावर यांच्याशी रीतसर करार करून ही कागदपत्रे ताब्यात घेऊन त्यावर काम चालू आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाअंतर्गत ५,८८,५०० एवढ्या मोडी कागदपत्रांचे जतन (प्रिझर्वेशन), व  संवर्धन (कंन्झर्वेशन) करण्यासाठी या कागदपत्रांची साफसफाई करणे, त्यातील कागदपत्रांच्या घड्या काढणे, फाटलेली कागदपत्रे दुरुस्त करणे, तसेच त्यांची सुव्यवस्थित मांडणी करून त्यातील  ३,७६,००० कागदपत्रांचे संगणकीकरण ५ लक्ष डिजिटायज इमेजेस / फ्रेम्स तयार करण्यात आले आहेत व त्याच्या २० एच.डी.डी. डिस्क संस्थेस प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित २,१२,५००  एवढ्या मोडी कागदपत्रांचे संगणकीकरण (डिजिटायजेशन) व पूरक काम तमिळ विद्यापीठात सुरू आहे.  या प्रकल्पाअंतर्गत संगणकीकृत केलेल्या ३,७६,००० (५ लक्ष फ्रेम्स/इमेजस) मोडी कागदपत्रांचे वाचन करून मराठीमध्ये (देवनागरी) १ ते ३ ओळीत या कागदपत्रांची सूची तयार करणे व मोडीपत्रांचे मराठी (देवनागरी)मध्ये लिप्यांतर करण्यासाठी अपेक्षित असलेल्या सक्षम मनुष्यबळाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करून ३७ मोडी अभ्यासकांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक पातळीवर प्रत्येकी ५० या प्रमाणे एकूण १८५० एवढी मोडी कागदपत्रं त्यांना सूची तयार करण्यासाठी देण्यात येऊन त्यांच्याकडून सूची तयार करण्याचे काम करून घेण्यात येत आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका!