महाराष्ट्र राज्याचे माजी मराठी भाषा मंत्री मा.ना श्री. विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून ‘पुस्तकांचं गाव’ हा प्रकल्प साकारला आहे. वाचनसंस्कृती जोपासण्यासाठीचा अभिनव प्रकल्प अशी या प्रकल्पाची थोडक्यात ओळख करून देता येईल. महाबळेश्वरजवळील भिलार या निसर्गरम्य गावी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. भिलार गावात घरे, लॉज आणि शाळा, मंदिरे अशी सार्वजनिक ठिकाणे मिळून ३० जागा निवडण्यात आल्या आहेत. या जागांमध्ये साहित्य प्रकारांनुसार प्रत्येकी सुमारे ५०० ते ७०० पुस्तके अशी सुमारे २५,००० पुस्तके ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक घरात, पर्यटकांना पुस्तके व्यवस्थित पाहता येतील, चाळता येतील आणि प्रसंगी आरामात बसून वाचता येतील अशी व्यवस्था आहे. अनुवादित साहित्य व कथा यांची २ दालने, कवितेची २ दालने, कृषी, उद्योग, कौशल्य विकास व व्यवस्थापन आणि ललित व वैचारिक साहित्य यांची २ दालने नव्याने सुरु करण्यात आली. त्यामुळे रसिकांना आता या नव्याने भर पडलेल्या पुस्तकांचाही आस्वाद घेता येणार आहे.

या गावात राहण्यासाठी उत्तम खोल्या, चहा-न्याहारी-भोजन इत्यादी सेवा सशुल्क उपलब्ध आहे. येथे विविध साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमही नियमित आयोजिले जातात.

पुस्तकांचं गाव भिलार या अभिनव प्रकल्पास दि. ०४ मे २०१९ रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. द्वितीय वर्षपूर्ती निमित्ताने भिलार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ‘पुस्तक जाणून घेऊया’ ही पुस्तकांविषयी सर्वांगीण मार्गदर्शन करणारी कार्यशाळा आणि कौशल इनामदार यांचा ‘अमृताचा वसा’ हा साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावकऱ्यांबरोबरच महाराष्ट्रभरातील रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच द्विवर्षपूर्तीनिमित्त भिलार या गावात साहित्य दालनांत झाली.

प्रकल्पाची वेबसाईट: www.pustakanchgaav.in

अभिप्राय द्यायला विसरू नका!