मराठी ही भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील एक महत्त्वाची भाषा असून ती महाराष्ट्राची राजभाषा आहे. महाराष्ट्राबरोबरच बृहन्महाराष्ट्र तसेच परदेशातही अनेक मराठी भाषक महाराष्ट्राची संस्कृती व मराठी भाषा,साहित्य यांचे जतन संवर्धन करण्यासाठी संस्थात्मक तसेच वैयक्तिक स्वरूपात कार्यरत आहेत. जगभरात अनेकविध कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते हे आपण जाणतोच. त्यामुळे परदेशातील मराठी भाषक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणून परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करुन, त्यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र शासनाकडून कौतुकाची थाप मिळेल आणि त्यांच्यातील परस्पर संवाद वाढून परदेशात मराठी भाषेचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईल या हेतूने आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे.
 
श्री. ज्ञानेश्वर मुळे हे या आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे मुख्य समन्वयक असून जगभरातील विविध १७ देशांतील मराठीसाठी कार्यरत असलेले सतरा जाणकार अभ्यासक उपसमन्वयक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
विविध देशातील अनिवासी मराठी भाषिक, मराठी भाषेसाठी काम करणारी विविध संस्था, मंडळे यांचा परस्परांबरोबर संपर्क साधून विविध देशात मराठी भाषेचा प्रचार-प्रसार, जतन व संवर्धन यासाठी होणारे उपक्रम, कार्यक्रम याबाबतचा आढावा घेऊन त्याबाबतची माहिती राज्य मराठी विकास संस्थेला सादर करणे या जबाबदाऱ्या समन्वयांना देण्यात आल्या आहेत. त्या अनुसार हे सर्वजण कार्यरत आहेत.
 
सोबत शासन निर्णय व समन्वयक आणि उपसमन्वयक यांची यादी

‘मराठीचा झेंडा अटकेपार’

देशोदेशीच्या मराठी माणसांची कामगिरी सगळ्यांसमोर आणता यावी, या निमित्ताने परदेशस्थ सगळ्या मराठी माणसांना एकमेकांच्या कार्याची माहिती मिळावी आणि दृक् श्राव्य माध्यमातून त्यांच्या या सगळ्या कार्याची दखलही घेता यावी या हेतूने  राज्य मराठी विकास संस्थेने मिती क्रिएशन्स यांच्या सहकार्याने ‘मराठीचा झेंडा अटकेपार’ असे शीर्षक असलेले १८ दृक् श्राव्य भाग दि. २२.०६.२०२४ ते २६.१०.२०२४ या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे फेसबुकपेज आणि यूट्युब वाहिनीवरुन डिजिटली प्रसारित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात श्री. ज्ञानेश्वर मुळे, आंतरराष्ट्रीय मंचाचे मुख्य समन्वयक, आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचा एक उपसमन्वयक आणि एक ज्येष्ठ साहित्यिक यांना निमंत्रित करुन यांच्यात सुसंवाद साधला आहे. या कार्यक्रमांच्या एकत्रित एकूण १८ भागांचा दुवा सोबत दिला आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका!