‘महाराष्ट्रातील मराठी संशोधन मंडळ/ संस्थांना अर्थसाहाय्य योजना’ ही राज्य मराठी विकास संस्थेची योजना मराठी भाषा विभागाच्या पत्रान्वये (संदर्भ क्र. मसंस २०१६/प्र.क्र.११५/२०१६/भाषा-२, दि. ३ जानेवारी, २०१७) कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मराठी भाषा, साहित्य व संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त मंडळ/ संस्थांना अर्थसाहाय्य करण्यात येते.

याच योजनेच्या अनुषंगाने, भाषाविकास संशोधन संस्था, हलकर्णी यांच्या चंदगडी बोली, समाज आणि संस्कृती (भाषाशास्त्रीय अभ्यास) या प्रकल्पाला व त्याअंतर्गत तयार करण्यात येणारा प्रकल्प-अहवाल सार्वजनिकरीत्या आणि विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेद्वारे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.

प्रकल्पाचे स्वरूप

चंदगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुक्याचे ठिकाण कोल्हापूर पासून १४५ कि. मी. अंतरावर असून, तालुक्यातील तेरवण, पारगड, तुडये, चिंचणे ही ठिकाणे चंदगडपासून साधारणता ४५ ते ५५ कि. मी. अंतरावर आहेत. हा तालुका डोंगराळ परिसरात असून तालुक्याच्या पश्चिमेला विस्तृत वनक्षेत्र, कोकण, गोव्याशी संलग्न असलेल्या तिलारी, आंबोली या दोन घाटमाथ्यांवर हा तालुका वसला आहे. दोन भिन्न भाषा-बोलींचा नित्यसंपर्क व महाराष्ट्राच्या भाषावार प्रांतरचनेपर्यंत विविध राजकीय अमल त्यातून झालेला भाषासंपर्क यामुळे या परिसरात एक वेगळी बोली तयार झाली आहे. तिलाच चंदगडी बोली म्हणून ओळखले जाते. या बोलीचे उच्चार, शब्दसंग्रह, व्याकरणिक व्यवस्था, इत्यादी संदर्भात प्रमाण मराठी पेक्षा स्वतःचे वेगळेपण आहे. चंदगडी बोलीचे क्षेत्रही विस्तृत आहे. त्यामुळे या बोलीत प्रदेश विशिष्ट भेद ठळकपणे दाखवता येतील. चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग, दोडामार्ग सावंतवाडी तालुक्याच्या सीमालगतची सर्व गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे व्यवहारासाठी ज्या बोलीचा वापर करतात ती पूर्णतः कोकणीच्या प्रभावाने तयार झालेली बोली आहे. तर चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमधून कन्नड भाषेच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरली जाते.

या बोलीवर असणारे भिन्न भाषांचे प्रभाव प्रभावाची कारणे बोलीचा प्रदेश आणि परभाषकांचा संपर्क, संपर्काची कारणे अशा अनेक अंगाने समाजभाषाविज्ञानातील संज्ञा-संकल्पनांचा आधार घेऊन या बोलीचे विश्लेषण सदर प्रकल्प अहवालात करण्यात आले आहे.

भाषाभ्यासक, संशोधक, शिक्षक व जिज्ञासू वाचक यांना उपयुक्त असा सदर चंदगडी बोली, समाज आणि संस्कृती (भाषाशास्त्रीय अभ्यास) हा प्रकल्प-अहवाल महाजालावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रकल्प-अहवाल

स्पष्टीकरण : सदर सामग्री ही केवळ प्रकल्प-अहवाल म्हणून उपलब्ध करण्यात आली असून या सामग्रीतून व्यक्त होणारी मते, विचारसरणी इ. प्रकल्पकर्त्यांची आहेत. त्यांपैकी कोणतेही मत, विचारसरणी इ. यांचा पुररस्कार महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था यांपैकी कुणीही करत नसून त्या त्या मताचे वा विचारसरणीचे दायित्व उपरोक्त विभागांवर असणार नाही.

अभिप्राय द्यायला विसरू नका!