मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आणि लोकभाषा आहे. भौगोलिक आणि सामाजिक स्तरांवर आपल्याला मराठी भाषेचे विविध भाषाभेद आढळतात. ह्या विविध भाषाभेदांना आपण मराठीच्या बोली असे संबोधत असतो.
मराठी भाषेतील ह्या भौगोलिक आणि सामाजिक स्तरांवरच्या वैविध्याचे भाषावैज्ञानिक वर्णन करण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने २०१७पासून मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण : प्रतिमांकन आणि आलेखन हा प्रकल्प कार्यरत आहे. त्यासाठी ह्या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रभर सर्वेक्षण करण्यात येत असून त्यासोबतच बोलींचे प्रतिमांकन (डिजिटायझेशन) तसेच बोलींतल्या निवडक शब्दांचे आणि वाक्यस्तरावरील काही विशेषांचे नकाशांच्या स्वरूपात आलेखन (मॅपिंग) करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये क्षेत्रपाहणीचे काम पूर्ण झाले असून ह्या सर्वेक्षणात १०१ तालुक्यांतील २३१ गावांतल्या २२८५ मुलाखतींचा समावेश आहे.
इ. स. १९०३ ते १९२८ या काळात ब्रिटीश अधिकारी सर जॉर्ज ग्रीयर्सन ह्यांनी भारतीय भाषांची पहिली पाहणी केली. भारतातील चारही भाषाकुटुंबातील सुमारे ३६४ भाषांचे आणि बोलींचे लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया ह्या ग्रंथाच्या १९ खंडांच्या स्वरूपात जतन केले. यापैकी सातव्या खंडात मराठी (आर्य भाषाकुटुंबाच्या दक्षिण समूहातील भाषा) आणि तिच्या बोलींचे सविस्तर विवेचन केले आहे.
प्रस्तुत प्रकल्प म्हणजे ग्रीयर्सन ह्यांच्या पाहणीनंतरची महाराष्ट्रव्यापी स्वरूपाची ही पहिलीच भाषिक पाहणी म्हणावी लागेल. ह्या प्रकल्पांतर्गत एप्रिल २०१८ पासून एकसमान पद्धतीचा अवलंब करून राज्यातील विविध जिल्ह्यांमधून भाषिक सामग्री ध्वनिमुद्रित करण्यात येत आहे. भाषा-अभ्यासकांना अतिशय उपयुक्त असा बोलीविशेषांचा समांतर संग्रह (पॅरेलल कॉर्पस) ह्या प्रकल्पातून तयार होत असून ह्या प्रकल्पांतर्गत गोळा करण्यात येणारी आणि निर्माण करण्यात येणारी सर्व सामग्री https://sdml.ac.in/mr ह्या स्वतंत्र संकेतस्थळावर उपलब्ध होत जाणार आहे. सर्वेक्षणाचे आणि विश्लेषणाचे काम जसजसे पूर्णत्वास जाईल तसतशी ती सर्व सामग्री ह्या संकेतस्थळावर उपलब्ध होत जाईल.
हे संकेतस्थळ मराठी व इंग्लिश अशा दोन्हीही भाषांमधून उपलब्ध असणार आहे. इतकेच नव्हे तर ही सर्व सामग्री मुक्तस्रोत (फ्री अॅण्ड ओपन सोर्स) परवान्याअंतर्गत सर्वांना उपलब्ध असेल. ही सामग्री केवळ पाहताच येईल असे नाही तर अभ्यासासाठी उतरवूनही घेता येईल.
ही सामग्री भाषाअभ्यासकांसाठी महत्त्वाची आहेच. पण सर्वसामान्य व्यक्तींनाही रोचक वाटू शकेल.