संगणकाद्वारे विविध कार्य करून घेण्यासाठी आज्ञावल्यांचा (प्रोग्रॅम वा सॉफ्टवेअर) वापर करणे आवश्यक आणि अनिवार्य असते. तथापि यांपैकी बहुतांश आज्ञावल्या या स्वामित्वाधीन (प्रोपरायटरी) असल्याने त्या आज्ञावल्यांसंदर्भात काही करायचे असल्यास ते केवळ तसे करण्याचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत त्यांनाच शक्य होते.

मात्र १९८०च्या दशकात सुरू झालेल्या मुक्त आज्ञावल्यांच्या चळवळीमुळे काही वेगळ्या स्वरूपाच्या आज्ञावल्या उपलब्ध होऊ लागल्या आहेत. या आज्ञावल्यांना मुक्त आज्ञावल्या असे म्हणतात. या आज्ञावल्यांचे निर्माते वापरकर्त्यांना पुढील चार स्वातंत्र्ये देत असतात. (स्वामित्वाधीन आज्ञावल्यांत ही स्वातंत्र्ये दिलेली नसतात.)

०१. आज्ञावली हवी त्या प्रकारे वापरण्याचे स्वातंत्र्य (यामुळे आज्ञावलीचा व्यावसायिक वा गैर व्यावसायिक असा कोणत्याही प्रकारे वापर करणे शक्य होते.)

०२. आज्ञावलीची यथामूल प्रत करून घेण्याचे आणि ती प्रत इतरांना देण्याचे स्वातंत्र्य. (यामुळे आज्ञावलीची प्रत करून घेणे वा इतरांना देणे हा अपराध ठरत नाही आणि सहकार्यशील राहण्यास प्रोत्साहन मिळते.)

०३. आज्ञावलीचा वापर करताना आवश्यक असल्यात आज्ञावलीत बदल करण्याचे स्वातंत्र्य. (आज्ञावलीचे काम आपल्याला हवे तसे नसेल आणि ते सुधारणे शक्य असेल तर तशी सुधारणा यामुळे करता येते. या स्वातंत्र्यात आज्ञावलीचा आज्ञालेख (सोर्सकोड) म्हणजे माणसांना वाचता येईल आणि बदल करता येईल अशी आज्ञावलीची प्रत उपलब्ध करून देणे गृहीत आहे. त्यामुळे मुक्त आज्ञावल्या असे आज्ञालेख उपलब्ध करून देतात.)

०४. आज्ञावलीत काही बदल केले तर त्या बदलांसह आज्ञावलीची सुधारित प्रत वितरित करण्याचे स्वातंत्र्य. (यामुळे आज्ञावलीच्या सुधारित प्रती तयार होण्याची शक्यता असते. मात्र असे करताना मूळ आज्ञावलीसंदर्भातील श्रेयनिर्देश करणे, मूळ आज्ञावलीत आपण नेमके कोणते बदल केले आहेत हे नोंदवणे या अटी पाळाव्या लागतात. तसेच श्रेयनिर्देश करताना मूळ रचनाकार या नव्या आज्ञावलीचा पुरस्कार करत आहेत असे ध्वनित न करण्याचीही अट पाळावी लागते.)

अशा रीतीने मुक्त (फ्री ॲण्ड ओपन सोर्स) आज्ञावल्यांची सर्व सामग्री मुक्त स्वरूपात उपलब्ध होत असल्याने त्यांचे मराठीकरण करणेही सुकर आहे. ही बाब लक्षात घेता काही निवडक अशा मुक्त आज्ञावल्यांचे मराठीकरण करण्याचा प्रकल्प संस्थेद्वारे हाती घेण्यात आला असून त्याअंतर्गत पुढील आज्ञावल्यांचे संगणकीकरण करण्यात येत आहे.

गिम्प

गिम्प (ग्नू इमेज मॅन्युप्युलेटिंग प्रोग्राम) (https://www.gimp.org/) ही मुख्यत्वे छायाचित्रित प्रतिमांचे संपादन करण्यासाठी वापरण्यात येणारी  मुक्त आज्ञावली आहे. या आज्ञावलीचे संवादपटल (इंटरफेस) तसेच माहितीपुस्तिका यांचे मराठीकरण करण्याचा प्रकल्प कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागाकडे सोपवण्यात आला आहे.

सदर आज्ञावली मुक्त असल्याने तिचे मराठीकरण (https://l10n.gnome.org/teams/mr/) केल्यास ते आज्ञावलीसह वितरित करता येते आणि सर्वाना त्यात मराठीचा पर्याय निवडता येणे शक्य होते.

ऑड्यासिटी

ऑड्यासिटी (https://www.audacityteam.org) ही ध्वनिमुद्रणासाठी अथवा ध्वनिमुद्रित सामग्रीच्या संपादनासाठी वापरण्यात येणारी  मुक्त आज्ञावली आहे. या आज्ञावलीचे संवादपटल तसेच माहितीपुस्तिका यांचे मराठीकरण करून ते उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड करीयर कोर्स (IMCC), पुणे या संस्थेकडे सोपवण्यात आला आहे.


प्रकल्प ०२
राज्य मराठी विकास संस्था

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय

३, महापालिका मार्ग, धोबीतलाव

मुंबई – ४००००१

अभिप्राय द्यायला विसरू नका!