भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्था (मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि व्हिजन व्हॉईस एन ॲक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखन व भाषा वैभवाचा परिचय करुन देणारा कार्यक्रम ‘अक्षरयात्रा’.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम साहित्यिकदेखील होते, हेआपणां सर्वांनाच ज्ञात आहे. त्यांचे मराठी व इंग्लिशवरचे प्रभुत्व, सहजपणे त्यांनी लिहिलेल्या कोणत्याही मजकूराचे भाषावैभव, त्या लेखनामागचा त्यांचा विचार या गोष्टी आपल्याला आजही थक्क करून टाकतात. याच गोष्टीचा प्रकर्षाने विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने एक आगळा कार्यक्रम करीत आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या साहित्याचे अभिवाचन अनेक नामवंत अभिवाचकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. केवळ अभिनेतेच नव्हे, तर उत्तम साहित्याचे उत्तम वाचक असलेल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि भाषा वैभवाबाबत आस्था असणाऱ्या व्यक्तींचाही या अभिवाचनामध्ये समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने डॉ. आंबेडकर यांनी घटना समितीसमोर केलेले भाषण, रमाबाईंना लिहिलेली पत्रे, वडीलांबद्दलचे लेखन, त्यांच्या काही उत्तम अर्पणपत्रिका, त्यांनी लिहिलेली इंग्लिश पत्रे आदींचा सामावेश आहे.