दलित आणि ग्रामीण साहित्य हे मराठी साहित्यातील महत्त्वाचे असे दोन प्रवाह आहेत. दलित-ग्रामीण साहित्यातील नवीन आणि अपरिचित शब्द, संज्ञा, संकल्पना, म्हणी, वाक्यप्रयोग प्रमाण मराठी भाषेत येणे आवश्यक असल्याने, असे शब्द विविध साहित्यकृतींमधून निवडून, त्यांचे अर्थ, तपशीलांसह या कोशात दिलेले आहेत. सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या प्रमुख संपादकत्त्वाखाली शब्दकोशाचे ३ खंड आणि विधी-परंपरा-कोशाचा १ खंड प्रकाशित झाला आहे.
लोकजीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडित अशा दलित-ग्रामीण साहित्यातील, शब्दांचा नेमका अर्थ सापडेल असा शब्दकोश मराठीत नसल्याने तसेच ह्या साहित्यामधून जे नवनवीन आणि अपरिचित शब्द मिळतात ते प्रमाण मराठी भाषेत येणे आवश्यक असल्याने असे शब्द विविध साहित्यकृतींमधून निवडून त्यांचे अर्थ तपशीलांसह या कोशात दिलेले आहेत. तो विशिष्ट शब्द असलेले साहित्यकृतीतील मूळ वाक्यही वाचकांच्या संदर्भासाठी त्या त्या नोंदीमध्ये दिलेले आहे.
दलित-ग्रामीण कोशासाठी आजपर्यंत झालेले काम सन १८१८ ते २००५ पर्यंतच्या कालखंडातील दलित-ग्रामीण साहित्यावरील आहे. आता या प्रकल्पाच्या सूची खंडाचे व सन २००६ ते २०१५ या कालखंडातील साहित्यकृतीवर आधारित शब्दकोशाचे काम करावयाचे आहे. `दलित-ग्रामीण साहित्य शब्दकोश, संकल्पना कोश व साहित्य सूची’ या प्रकल्पाच्या कामानिमित्ताने साधारणतः सहा हजार ग्रंथांच्या नोंदींचे कार्ड वेळोवेळी तयार करण्यात आले आहेत. या कार्डांच्या आधारे `दलित-ग्रामीण साहित्य वर्णनात्मक सूची’ खंड तयार करावयाचा आहे.