राज्य मराठी विकास संस्था आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धा
“रंगवैखरी”

राज्य मराठी विकास संस्था आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धा

मराठी भाषा, साहित्य व महाराष्ट्राची विविधांगी संस्कृती यांसंदर्भातील विविध कार्यक्रम महाराष्ट्रात सातत्याने होत असतात. असे असले तरी महाविद्यालयीन स्तरावर मराठी भाषा या विषयाला केंद्रीभूत मानून त्यायोगे मराठी भाषा, साहित्य व महाराष्ट्राची संस्कृती यांचे सादरीकरण एकाच ठिकाणी करता येईल अशी स्पर्धा नव्हती हे लक्षात घेऊन मराठी साहित्याबरोबरच चित्र, शिल्प, नृत्य, गायन, संगीत या कलांमधून मराठी भाषा व महाराष्ट्रीय संस्कृती यांचे नाट्यसादरीकरण करणारी रंगवैखरी ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धा राज्य मराठी विकास संस्थेमार्फत सन २०१७ पासून आयोजित करण्यात येत आहे.

रंगवैखरी ही आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार-स्पर्धा ही मराठीच्या समृद्ध अशा भाषिक साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे. महाराष्ट्राचे भाषिक, सांस्कृतिक संचित नाट्य, चित्र, शिल्प, नृत्य, संगीत, गायन यांच्या एकत्रित नाट्याविष्कारातून महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रकट करता यावे या हेतूने रंगवैखरी (वैखरी म्हणजे वाचा, वाणी, भाषा. विविध कलांच्या विविध रंगी आविष्काराने भाषा मंचित केली जाईल म्हणून रंगवैखरी) या अभिनव नाट्याविष्कार स्पर्धेची मांडणी करण्यात आलेली आहे.

दि. १२ एप्रिल २०१८ रोजी राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यकारी समितीने रंगवैखरी स्पर्धेस तीन वर्षासाठी मान्यता दिली होती. मात्र या स्पर्धेला मिळणारा उत्तम प्रतिसाद लक्षात घेता ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यास कार्यकारी समितीने दि. ११ ऑगस्ट २०२० रोजी मान्यता दिलेली आहे.

संस्थेच्या कार्यपद्धतीनुसार नियामक मंडळातील दोन सदस्य व संस्थेतील स्पर्धाप्रमुख व संचालक यांच्या समितीमार्फत विषयाची निवड केली जाते. व त्या निवडलेल्या विषयाच्या अनुषंगाने महाविद्यालयीन संघांनी किमान ३५ ते ४५ मिनिटांचा नाट्याविष्कार सादर करायचा असतो. या सादर केल्या जाणाऱ्या नाट्यसादरीकरणात चित्र, शिल्प, नृत्य, गायन, संगीत यांच्यापैकी किमान तीन कलांचा समावेश असणे तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालयाच्या संघातील सर्व कलावंत, लेखक, दिग्दर्शक हे संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थी असणे व स्पर्धेच्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात शिकत असणे बंधनकारक असते.

ही स्पर्धा महाराष्ट्रातील आठ तसेच बृहन्महाराष्ट्रातील बेळगाव व गोवा अशा निवडक दहा केंद्रांवर घेतली जाते. त्या सर्व केंद्रांसाठी केवळ स्पर्धेच्या कामासाठी स्वयंसेवकांची नेमणूक संस्थेतर्फे करण्यात येते. स्पर्धेचे सर्व नियोजन संस्थेचे संचालक व संस्थेतील स्पर्धाप्रमुख संस्थेच्या समिती सदस्यांच्या सल्याने  ठरवत असतात.

प्राथमिक, विभागीय अंतिम व महाअंतिम फेरी अशा तीन फेऱ्यांधून सर्वोत्कृष्ट ५ नाट्याविष्कार निवडून त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. वैयक्तिक व सांघिक स्वरूपाची अशी जवळपास ११ लाख रूपयांचे रोख पुरस्कार या स्पर्धेच्या निमित्ताने देण्यात येतात.

या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी मराठी साहित्य, नाट्य, चित्र, शिल्प, नृत्य, गायन व संगीत क्षेत्रातील दिग्गज निमंत्रित केले जातात. केवळ अजून एक वेगळी नाट्याविष्कार स्पर्धा असे स्वरूप रंगवैखरीला येणार नाही, मराठी भाषा, साहित्य व महाराष्ट्राची संस्कृती यांसंबंधी विद्यार्थ्यांची जाण विकसित व्हावी या दिशेने पुढील वर्षापासून निश्चितपणे प्रयत्न करण्यात येणार आहेत. भाषा वा संस्कृतीचा विकास हा आपोआप कधीच होत नसतो त्यासाठी सकारात्मक पद्धतीने कृती करण्याची आवश्यकता असते या गोष्टीचे भान निश्चितपणे यामागे आहे.

दरवर्षी राज्य मराठी विकास संस्थेतर्फे स्पर्धेसाठी भाषा-साहित्य-संस्कृती यासंबंधी जो विषय जाहीर करण्यात येईल त्यासंदर्भात भाषा-साहित्य तसेच विविध कलांचे तज्ज्ञ यांच्याबरोबर विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष चर्चा होईल, वैचारिक देवाणघेवाण होईल यादृष्टीने पुढील वर्षापासून प्रत्येक केंद्रावर भाषा-साहित्य-कलाविषयक कार्यशाळा, व्याख्याने, कृतीसत्रे अशा विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आहे. रंगवैखरी ही स्पर्धा भाषा, साहित्य व इतर कलांना जोडणारा पुल व्हावी असा प्रयत्न आहे.

पहिल्या वर्षी संस्थेने मराठी भाषेच्या विविध टप्प्यांचा विचार विद्यार्थ्यांनी करावा या हेतूने ‘महाराष्ट्री ते मराठी’ असा विषय दिला होता. पहिल्या वर्षी वेळ कमी असून देखील महाराष्ट्रातून २५ संघांनी सहभाग नोंदवला. दुसऱ्या वर्षी मराठी साहित्यातील नामवंत अशा कादबंरीकार व कवी यांच्या साहित्याचा अभ्यास विचार विद्यार्थ्यांनी करावा व त्या साहित्यावर आधारित नाट्याविष्कार सादर करावा यासाठी ‘नव्या वाटा’ असा विषय दिला होता. पहिल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट संघांनी म्हणजे ७४ महाविद्यालयांनी दुसऱ्या पर्वात सहभाग नोंदवला. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर बेळगावातून देखील ६ संघ सहभागी झाले होते.

पहिल्या दोन्ही पर्वांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाल्याने सन २०१९-२० मध्ये तिसरे पर्व “कथारंग” जाहीर करण्यात आले. मराठीतील नामवंत कथाकारांतून निवडक कथाकारांच्या कथासाहित्यावर नाट्याविष्कार सादर व्हावेत याहेतूने  मराठीतील नामवंत अशा २५ कथाकारांची अंतिम निवड केली गेली. या पर्वासाठी महाराष्ट्र व बेळगाव येथून ८५ महाविद्यालयांनी प्रवेशअर्ज सादर करून स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तथापि काही तांत्रिक कारणाने यावर्षी स्पर्धा स्थगित करण्यात आली. सद्यस्थितीतील कोविड-१९ चा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर योग्य त्या विहित कार्यपद्धतीने स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहेत.

या स्पर्धेमुळे महाविद्यालयीन स्तरावर मराठी भाषा, साहित्य व महाराष्ट्राची संस्कृती या संदर्भात चैतन्य निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थी या स्पर्धेमुळे वाचन करण्यास व त्यासंदर्भात विचार करण्यास प्रवृत्त होऊ लागली आहेत. मराठी भाषा, साहित्य व महाराष्ट्राची संस्कृती याचे सादरीकरण या रंगवैखरी स्पर्धेमुळे शक्य होत आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

रंगवैखरीचे युट्युब चॅनेल सुरू करण्यात आले असून पहिल्या व दुसऱ्या पर्वातील पुरस्कारप्राप्त नाट्याविष्कार त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यास जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

अधिक माहितीसाठी व स्पर्धेतील नाट्याविष्कार पाहण्यासाठी संकेतस्थळ, फेसबुक पेज व युट्युब चॅनेल भेट द्या.

संकेतस्थळ – https://sites.google.com/site/rmvsrangavaikhari/

फेसबुक पेज – https://www.facebook.com/marathikalabimb/

युट्युब चॅनेल – RANGAVAIKHARI रंगवैखरी

अभिप्राय द्यायला विसरू नका!