‘महाराष्ट्रातील मराठी संशोधन मंडळ/ संस्थांना अर्थसाहाय्य योजना’ ही राज्य मराठी विकास संस्थेची योजना मराठी भाषा विभागाच्या पत्रान्वये (संदर्भ क्र. मसंस २०१६/प्र.क्र.११५/२०१६/भाषा-२, दि. ३ जानेवारी, २०१७) कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मराठी भाषा, साहित्य व संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त मंडळ/ संस्थांना अर्थसाहाय्य करण्यात येते.

याच योजनेच्या अनुषंगाने, विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर यांच्या मराठी शाहिरांची आध्यात्मिक कविता या प्रकल्पाला व त्याअंतर्गत तयार करण्यात येणारा प्रकल्प-अहवाल सार्वजनिकरीत्या आणि विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेद्वारे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.

प्रकल्पाचे स्वरूप

मराठी वाङ्मयात शाहिरी काव्य परंपरा हा एक स्वतंत्र आणि समृद्ध काव्यप्रवाह आहे आणि आध्यात्मिक आशयाच्या लावण्या लिहून आपल्या काव्यधारेच्या वेगळेपणाबरोबरच काव्य परंपरेशी आपली नाळ जोडून ठेवलेली आहे. त्याची स्पष्ट जाणीव करून देणे ह्या दृष्टीने त्या काव्याचा परामर्श व समीक्षा करणे.

शाहिरांनी केवळ लावणी आणि पोवाडे लिहिलेत असा सर्व सामान्य समज.  परंतु मराठी प्राचीन व मध्ययुगीन आध्यात्मिक काव्य परंपरेत शाहिरांनी योगदान दिले. त्यासंबंधी संशोधनास भरपूर क्षेत्र उपलब्ध आहे. ‘संत, पंत आणि तंत’ अशीही आध्यात्मिक आशयाची काव्यधारा आहे. त्यात ‘तंत’ कवी म्हणजे शाहिरांची लक्षणीय योगदान आहे.

अव्वल इंग्रजी कालखंड व स्वातंत्र्यपूर्व काळातील शाहिरांच्या काव्यातील आध्यात्मिक जाणिवा शोधणे, मराठीतील नामवंत शाहिरांचा अभ्यास करणे आणि त्यांच्या काव्यातील ‘आध्यात्मिक’ आशयाचे स्वरूप स्पष्ट करणे. आध्यात्मासंबंधीच्या ज्ञानाचा (तत्त्वज्ञानाचा) त्यांचा अभ्यास कुठून झाला असेल याचा वेध घेणे आणि या काव्याचा एकूण परिणाम समाजमानसावर काय आणि कसा झाला असेल? या साहित्याने त्यांच्या समकालीन साहित्यात आणि मध्ययुगीन काव्य परंपरेत कोणती भर घातली याचा शोध घेणे, असे या प्रकल्पाचे साधारणतः स्वरूप आहे.

भाषाभ्यासक, साहित्य संशोधक, शिक्षक व जिज्ञासू वाचक यांना उपयुक्त असा सदर मराठी शाहिरांची आध्यात्मिक कविता हा प्रकल्प-अहवाल महाजालावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रकल्प-अहवाल

 

स्पष्टीकरण : सदर सामग्री ही केवळ प्रकल्प-अहवाल म्हणून उपलब्ध करण्यात आली असून या सामग्रीतून व्यक्त होणारी मते, विचारसरणी इ. प्रकल्पकर्त्यांची आहे. त्यांपैकी कोणतेही मत, विचारसरणी इ. यांचा पुरस्कार महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था यांपैकी कुणीही करत नसून त्या त्या मताचे वा विचारसरणीचे दायित्व उपरोक्त विभागांवर असणार नाही.

 

अभिप्राय द्यायला विसरू नका!