मुंबई ही आर्थिक राजधानी…त्यामुळे पुणे किंवा नाशिकहून याठिकाणी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे या दोन्ही शहरांतून रेल्वेने मुंबईला दररोज येणारेही असंख्य नोकरदार आहेत. ‘वाचेल तो वाचेल’ असे म्हणत असतानाच या दररोजच्या प्रवाशांचा प्रवास आनंददायी व्हावा आणि त्यांचा प्रवासातील वेळ सत्कारणी लागावा यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. रेल्वे प्रवासातील वेळात त्यांना वाचनासाठी संस्थेकडून पुस्तके उपलब्ध करुन दिली जातात.

फिरते वाचनालय अशी संकल्पना असलेल्या या उपक्रमांतर्गत संस्थेचे वाचनदूत ठराविक पुस्तके घेऊन रेल्वेच्या या डब्यांमध्ये फिरतात. विशेष म्हणजे ही सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात येते. सध्या हा प्रकल्प पुणे-मुंबई मार्गावरील दख्खनची राणी आणि मुंबई-नाशिक मार्गावरील पंचवटी एक्सप्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. वाचनाची परंपरा वाढावी आणि ती रुजावी यासाठी हा प्रकल्प डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी म्हणजेच वाचन प्रेरणादिनाच्या निमित्ताने सुरु करण्यात आला आहे. येत्या काळात आणखी १६ मार्गांवरील रेल्वेंमध्ये ही योजना सुरू करण्याचे नियोजन आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका!