महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी अर्थसहाय्य
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृद्धी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी संस्थांना अर्थसाहाय्य करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार दिनांक १४.०६.२०२२ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांना/ मंडळांना सदर शासन निर्णयातील परिच्छेद २ (२) मध्ये नमूद केलेल्या अटी-शर्तीच्या अधीन राहून अर्थसाहाय्य/ अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी अर्थसाहाय्य” हा नवीन उपक्रम म्हणून मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त राज्य मराठी विकास संस्था यांच्या मार्फंत राबविण्यात येत आहे.
मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. कसीयो-१०१२/प्र.क्र.१३९/२०१२/भाषा-३, दि. २१.०१.२०१३ अन्वये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृद्धी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनातर्फे एक खास बाब म्हणून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी संस्थांना शासनाच्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या/ पात्र ठरणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
प्रस्तावना:-
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील, महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृद्धी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी संस्थांना सन २०२२-२३ मध्ये १ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.
राज्य मराठी विकास संस्थेने या योजनेअंतर्गत, निश्चित केलेल्या विहित कार्यपद्धती व निकषांना अनुसरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषा, साहित्य व संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त पात्र संस्थांना/ मंडळांना रु. १०.०० लक्षच्या कमाल मर्यादेत अनुदान करण्यात येणार आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अर्थसाहाय्य देण्यासाठी पात्र मंडळे / संस्थांकडून दिनांक ०१/०१/२०२३ ते ३१/०१/२०२३ या विहित कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसंदर्भातील कार्यपद्धती व निकष, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील मंडळे/ संस्था यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना, अर्थसाहाय्यासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज तसेच इतर सविस्तर तपशील राज्य मराठी विकास संस्थेच्या https://rmvs.marathi.gov.in या व महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील मंडळे/ संस्था यांच्यासाठी अर्थसाहाय्य’ या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच सदर अर्ज राज्य मराठी विकास संस्था, एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय, पहिला मजला, ३ महापालिका मार्ग, धोबीतलाव, मुंबई ४०० ००१ (०२२-२२६५३९६६) येथे वरील विहित कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. सदर अर्थसाहाय्याचे अर्ज विहित नमुन्यात व विहित कालावधीत दिनांक ०१/०१/२०२३ ते ३१/०१/२०२३ पर्यंत राज्य मराठी विकास संस्थेकडे सादर करणे बंधनकारक राहील. तसेच पूर्ण भरलेला अर्ज व संबंधित जोडपत्रे स्कॅन करून mks2223.rmvs3@gmail.com या इ पत्त्यांवर इ-टपालाद्वारे (इ मेल) विहित कालमर्यादेत पाठवावा विहित कालावधीनंतर येणाऱ्या अर्जांचा अर्थसाहाय्यासाठी विचार केला जाणार नाही.
खालील बटणांवर क्लिक करून धारिका (Files) डाऊनलोड (Download) कराव्यात.
जाहिरात | अर्ज,अटी व शर्ती | शासन-निर्णय |
सूचना – महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती क्षेत्रातील हक्क सांगितलेल्या कर्नाटक राज्यातील ८६५ गावांच्या यादीचा १० जुलै २००८ रोजीचा शासन निर्णय.